


वर्धा : नॅशनल हायवे क्रमांक ४४ ने जाम ते हिंगणघाट रोडवरील सरकारी दवाखाना चौक परिसरात पोलिसांनी नाकेबंदी करून ट्रक मधून अवैध वाहतूक होणाऱ्या १४ जनावरांची सुखरूप सुटका करत २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला व तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मोहतशीम आलम मुक्तार अन्सारी (४२), इप्नान खान मुस्ताक खान (3८) व फिरोज कुरेशी सर्व रा. कामठी जिल्हा नागपूर असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई रविवारी स्थानिक गुन्हे शाखेने केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की, नॅशनल हायवे क्रमांक ४४ ने जाम कडून हिंगणघाट रोडने ट्रक एमएच ४० सीटी ०४३४ क्रमांक मध्ये अवैधरीत्या गोवंश जनावरांची वाहतूक करीत आहे. पोलिसांनी सदर वाहनास हिंगणघाट परिसरातील सरकारी दवाखाना चौक परिसरात नाकेबंदी करीत ट्रक थांबविला. वाहनांची तपासणी केली असता वाहनात गोवंश जातीची एकूण १४ जनावरे दिसली. पोलिसांनी सदर आरोपींकडून १४ गोवंशाची सुखरूप सुटका केली. व ट्रकसह एकूण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात केली.