


वर्धा : फटाकेमुक्त दिवाळी आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा व शहर शाखेच्या वतीने, तसेच आर्वी, समुद्रपूर, आष्टी, कारंजा घाडगे, हिंगणघाट, देवळी आणि सेलू शाखांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन यात्रेला आज वर्ध्यातून प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून या यात्रेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या ३६ वर्षांपासून राज्यभर बुवाबाजी, अनिष्ट चालीरीती, व प्रथा-परंपरांविरोधात विवेकनिष्ठ समाजमन निर्मितीसाठी प्रबोधन करत आहे. याच परंपरेतून यंदाही फटाकेमुक्त आणि व्यसनमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यासाठी महिला कार्यकर्त्यांच्या टू-व्हिलर प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले.
फटाके फोडल्याने होणारे प्रदूषण, आगीच्या घटना, तसेच बालके, वृद्ध आणि प्राण्यांवरील परिणाम लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयानेही या बाबत दखल घेतली आहे. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या ‘प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी फटाकेमुक्त दिवाळी’ मोहिमेत समितीने सक्रिय सहभाग घेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील सर्व आठ शाखांतील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोन ते चार सदस्यांच्या टीम तयार करून शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसमोर प्रबोधन सत्रे आयोजित करण्याचा संकल्प केला आहे.
या प्रसंगी राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, वाचन विकास प्रकल्पाचे संस्थापक प्रा. सचिन सावरकर, जिल्हाध्यक्ष बाबाराव किटे, प्रधान सचिव भरत कोकावार, तसेच वरिष्ठ कार्यकर्ते अशोक हेडावू, प्रा. डॉ. राठोड, समता परिषदेचे विनय डहाके, प्रा. माधुरी झाडे, सारिका डेहनकर, जिल्हा पदाधिकारी कविता राठोड, कविता लोहट, प्रा. डॉ. मंजुषा देशमुख, प्रतीभा ठाकूर, पंकजा गादेवार, कल्पना सातव-फुसाटे, व्दारकाताई ईमडवार, रजनी सुरकार, रश्मीताई गिरडे, उज्वला वैद्य, ज्योत्स्ना जांभुळकर, प्राची काकडे, स्नेहल धोटे, कोमल चौधरी, आदिती धोपटे, गायत्री बेहरे, सिमा भोयर, शितल बिलोणे, भूषण खैरकार, शंकर श्रीरामे, अमोल धोपटे आदींचा समावेश आहे.