


पवनार : पर्यावरणाचे संतुलन राखू, हिरवळ वाढवू तर पुढील पिढ्या जिवंत राहतील. आपण संयुक्तपणे गेल्या तीन वर्षांपासून नाग टेकडीवर वृक्षारोपणाचा जो उपक्रम राबवीत आहात, तो खरच स्तुत्य आहे. यावर्षी विविध फळांची रोपे लावून त्यांना कठड्यांचे संरक्षण आपण दिले. यातून वन्यप्राणी टेकडीवरील झाडांवरील फळे खातील व शेतशिवारात होणारे पिकांचे नुकसान, नासधूस थांबेल, असे मत वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन पावडे यांनी केले.
स्थानिक तपोवन बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था व वर्धा येथील कृषी विभाग कर्मचारी वृंद सहकारी पतसंस्था, पवनार ग्रामपंचायत कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फळरोप लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे, वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे, ग्रामविकास अधिकारी आदिनाथ डमाळे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत, कृषी विभाग कर्मचारीवृंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत भोयर, प्रा. डॉ. पुरुषोत्तम खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. मेघे यांनी सांगितले की, पर्यावरणाच्या समतोलाकरिता झाडे लावणे आणि ती जगविणे अत्यंत आवश्यक आहे. आपण सर्वांनी पुढाकार घेऊन या वृक्षांचे संगोपन केले पाहिजे. प्रवीण धोपटे म्हणाले की, आपण जे वृक्षारोपण व जतनाचे काम करीत आहात, ते या परिसरातील पुढील पिढ्या लक्षात ठेवेल. हरितपट्ट्याने हा परिसर निसर्गसौंदर्याने नटेल आणि येथे नागरिकांना निसर्गाचे सान्निध्य अनुभवता येईल. कार्यक्रमाची सांगता वृक्षांचे जतन करण्याचा संकल्प घेऊन करण्यात आली. या उपक्रमामुळे निसर्गाचा समतोल राखण्यास निश्चितच मदत होणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमाकरिता सामाजिक कार्यकर्ते जयंत गोमासे, नितीन कवाडे, माजी उपसरपंच राहुल पाटणकर, विशाल नगराळे, मनीष ठाकरे, अंजार शेख, संजय आदमाने, प्रफुल्ल मुंगले, अतुल सगळे, अरुण पवार, गिरीश ठाकरे, सतीश पानखावशे, अमोल उमाटे, नरेश बावणे, इब्राहिम पठाण, गोविंद वानखेडे, शेखर लोखंडे, अंगणवाडीसेविक जयश्री भट, महानंदा हुलके, अरुणा नगराळे, छाया पेठकर, सतीश खेळकर, प्रशांत भोयर, हर्षू तोटे, सतीश अवचट, सतीश खेलकर, राहुल खोब्रागडे, गणेश मसराम, सुरेश काशीकर, प्रकाश कोसरे, प्रतीक वाघमारे आणि सायली आदमने यांनी सहकार्य केले.