

वर्धा : कोरोना काळामुळे अनेकांना आपले गाव, शहरच नाही, तर राज्यही सोडावे लागले. त्यामुळे कोणताही परिवार रेशनच्या धान्यापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने ‘वन नेशन, वन रेशन’ ही योजना सुरू केली. त्यामुळे कोणत्याही राज्यातील लाभार्थ्याला कोणत्याही रेशनच्या दुकानातून धान्य मिळण्याची सुविधा झाली आहे.
परजिल्हा, परराज्य इतकेच नाही तर जिल्हा व गावाबाहेरील लाभार्थ्यांनाही या योजनेचा मोठा फायदा झाला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे दरमहा मिळणारे धान्य बाहेरून आलेल्यांनाही सहज उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात परराज्यातील परिवार मोठ्या प्रमाणात दाखल होतात. आतापर्यत सहा परराज्यांतील परिवारांना “वन नेशन, वन शेशन’ या योजनेतून धान्याचा लाभ मिळाला आहे. तसेच एक शहर किंवा गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी गेलेल्या जिल्ह्यातील तब्बल १२ हजार ३१३ लाभार्थ्यांनाही या योजनेतून या महिन्यात आतापर्यंत रेशनचे धान्य देण्यात आले आहे.