

वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोलिस वेलफेयर विभागाच्या निर्माणाधीन पेट्रोलपंप दुसरीकडे हलविण्याकरिता विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत पेट्रोलपंप हटाव कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाभर आंदोलन करीत रस्त्यावर उतरलेले आहे. पोलिस प्रशासन आणि शासनाविरोधात घोषणाबाजी करीत पालकमंत्री सुनिल केदार आणि आमदार रंजित कांबळे यांच्या पुतळ्याचे दहन यावेळी भिम टायगर सेनेचे तालुका अध्यक्ष विशाल नगराळे यांच्या नेतृत्वात पवनार येथील बसस्थानक परिसरात आंदोलकांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोलिस वेलफेयर विभागाच्या निर्माणाधीन पेट्रोलपंप हटविण्यात यावा याकरीता गेल्या ५९ दिवसापासुन आंबेडकर पुतळ्याजवळ आंबेडकरी अनुयायी आणि संघटनां साखळी उपोषण करीत आहे. या जागी बनत असलेल्या पेट्रोलपंपला प्रचंड विरोध होत असताना दुसरीकडे मात्र पोलिस विभागाचे पेट्रोल पंपचे काम चालू आहे. या आंदोलनाची कोणतीही दखल शासन प्रशासन घेत नसल्याने आंबेडकरी संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज जिल्ह्यात ठिकठिकाणी पालकमंत्री सुनिल केदार आणि आमदार रंजीत कांबळे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
आंबेडकरी समजाने पेट्रोलपंप दुसरीकडे हलविण्याची मागणी केली आहे, याकरीता गेल्या अनेक दिवसापासून मोर्चे, आंदोलने चालूच आहे. मात्र याची कोणतीही दखल शासन प्रशासन घेताना दिसत नाही. मात्र आता आंबेडकरी जनतेचा संयमाचा बांध तुटत चाललेला आहे. त्याचा उद्रेख होण्यास हळहळू सूरवात आहे. पेट्रोलपंपचा मुद्दा चिघळत असताना त्यावर तोडगा काढण्याबाबत शासन-प्रशासनाकडून फारसे प्रयत्न होत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे हे आंदोलन आता चिघळण्यास सुरवात झालेली आहे.