
वर्धा : आर्वी वनपरिक्षेत्रातील ब्राह्मणवाडा जंगल परिसरासह शेत शिवारात पाळीव जनावरांचा फडशा पारणारी बोर व्याघ्र प्रकल्पातील बीटीआर-३ कॅटरीना नामक वाघिण असल्याचा तसेच ती तिच्या दोन छाव्यांना शिकारीचे प्रशिक्षण देत असल्याचा कयास काही वन्यजीव प्रेमींकडून लावल्या जात होता. पण पाच ते सहा दिवसांपूर्वीच कॅटरीनाचे दर्शन बोर व्याघ्र प्रकल्पात झाल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितल्याने ही वाघिण नेमकी कोण व कुठली याबाबतची माहिती वनविभाग गोळा करीत आहे. विशेष म्हणजे सध्या या वाघिणीने आपल्या दोन छाव्यांसह ढगा भुवनकडे आपला मोर्चा वळविल्याने सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनीही दक्ष राहून उन्हाळवाहीची कामे करण्याची गरज आहे.
प्राप्त माहितीनुसार, अवथळे नामक पशुपालकाच्या मालकीची गाय २१ फेब्रुवारीला पट्टेदार वाघाने मारल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. त्यानंतर गाईचा फडशा पाडणारा वाघ की बिबट याची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी आर्वीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव यांनी वरिष्ठा मार्गदर्शनात ब्राह्मणवाडा परिसरात सुरूवातीला चार ट्रॅप कॅमेरे लावले. याच कॅमेऱ्यात एक प्रौढ वाघिण तिच्या सुमारे १२ ते १४ महिन्यांच्या दोन छाव्यांसह कैद झाली. त्यामुळे ब्राह्मणवाडा जंगल शिवारात वाघाचा मुक्त संचार होत असल्याची इत्यंभूत माहितीही वनविभागाला प्राप्त झाली.
खबरदारीचा उपाय तसेच या वाघिणीसह तिच्या दोन्ही छाव्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी वनविभागाने एकूण १६ ट्रॅप कॅमेरे या भागात आवश्यक ठिकाणी लावले होते. ब्राह्मणवाडा शिवारात काही दिवस राहिलेल्या या वाघिणीचा बारकाईने अभ्यास केल्यावर ही बाघिण आपल्या छाव्यांना सुरक्षित ठिकाण असलेल्या परिसरात शिकारीचे प्रशिक्षण देत असल्याचेही वनविभागाच्या निदर्शनास आले आहे. असे असले तरी या वाघिणीने आपल्या छाव्यांसह सध्या ढगा भुवन जंगल परिसराकडे आपला मोर्चा वळविल्याचे सांगण्यात येते.


















































