31 मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यासंदर्भात ठाकरे सरकारचे एकमत

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत चर्चा

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसून देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवलं जाणार असल्याची घोषणा केली असून ते कधीपर्यंत वाढवलं जाणार आहे याबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही. केंद्र सरकारकडून जोपर्यंत लॉकडाउन ४ च्या नव्या अटी-शर्थींची सविस्तर माहिती दिली जात नाही तोपर्यंत राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाणार नाही अशी सुत्रांची माहिती आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीदेखील बैठकीला हजर होते.या बैठकीत लॉकडाउन ३१ मे पर्यंत कायम ठेवण्यावर एकमत झालं आहे. सोबतच उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे. पण करोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचंही समजत आहे. मात्र अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकत घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने सविस्तर माहिती दिल्यानंतरच राज्य सरकारडून घोषणा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्याने केंद्र सरकारने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना १७ मे नंतरही लॉकडाउन कायम असेल अशी घोषणा केली होती. मात्र तो कधीपर्यंत कायम असेल तसंच कोणते निर्बंध शिथील असतील याची माहिती दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here