
वर्धा : पेट्रोल-डिझेलचा साठा संपणार असून पुढील काही दिवस पुरवठा होणार नाही, या केवळ एका अफवेने शहरवासींमध्ये प्रचंड घबराट निर्माण केली. या धास्तीपोटी मंगळवारी (ता. २४) दुपारपासूनच शहरातील सर्वच पेट्रोलपंपांवर वाहनधारकांची तोबा गर्दी उसळली. ही गर्दी बुधवारीदेखील कायम होती. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंगळवारी दुपारच्या सुमारास सोशल मोडियावर पेट्रोल टंचाईबाबतची अफवा वाऱ्यासारखी पसरली. बघता बघता दुचाकी आणि चारचाकी वाहमधारकांनी पेट्रोलपंपांकडे धाव घेतली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, मंगळवारी रात्रो उशिरापर्यंत आणि बुधवारी पहाटेपासूनच पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक पेट्रोलपंप चालकांनी आपले पंप तात्पुरते बंद ठेवले होते, ज्यामुळे ‘पॅनिक’मध्ये अधिकच भर या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाने रात्री उशिरा पट्रोल डिझेलचा पुरवठव साठा असल्याचे सांगत जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले.
जिल्ह्यात विविध कंपन्यांचे एकूण ८८ पेट्रोलपंप कार्यान्वित आहेत. बुधवारी (ता. २५) जिल्ह्यात २ लाख ९२ हजार २४३ लिटर पेट्रोलचा साठा शिल्लक होता, तर ४ लाख ५३ हजार ९१७ लिटर डिझेलचा साठा शिल्लक होता. जिल्हा पुरवठा विभागाने पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपल्ब्ध असुन पुरवठा साखळीत कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात पेट्रोल- डिझेलचा तुटवडा नाहो. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये आणि विनाकारण गर्दी करून ‘पॅनिक’ होऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. केवळ अफवेमुळे निर्माण झालेल्या या कृत्रिम टंचाईच्या वातावरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.


























































