
आर्वी : खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणारे एक मोठे आंतरराज्य रॅकेट उघडकीस आले आहे. बोगस आणि विनापरवाना बियाण्यांची तिक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत कृषी विभागाने पोलिसांच्या मदतीने तब्बल २९ लाख ४६ हजार ८४६ रुपये किमतीचा बनावट बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बनावट बियाण्यांचे धागेदोरे थेट शेजारच्या गुजरात राज्याशी जोडलेले असल्याचे तपासात उघड झाले असून, या ‘गुजरात कनेक्शन’मुळे कृषी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
संजय मारोतराव गोपाळे (२२, रा. शिरपूर बोके) याने बनावट बियाण्यांची साठवणूक त्याच्या गोदामात केल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण निरीक्षक संजय बमनोते यांनी तक्रार दिली होती. त्यावरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजय गोपाळे याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने बनावट ब्रियाणे ‘पूनम अँग्रोटेक बीएच पटेल समज राजकोट गुजरात येथील कंपनीकडून अनधिकृतपणे एचटीबीटी कापूस बियाणे खरेदी केले तसेच बियाण्यांची पॅर्किंश करणे व विक्रीचे काम केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत २९ लाख ४६ हजार ८४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरमकुमार अग्रवाल यांच्या निर्देशात उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सतीश डेहनकर, पोलिस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, दिगांबर उईके, अंकुश निचत, क्रषिकेश घंगारे, सुरजसिंग बावरी, सागर पाचोडे, सुरज रिठे, संजय बोकडे, बालाजी मस्के, प्रशांत नाबरिया यांनी केली. मागील काही दिवसांपूर्वी पुलगाव नजीकच्या नाचणगाव येथे देखील बनावट बियाण्यांचा साठा भरारी पथकाने पकडला होता.



























































