
वर्धा : शहरासह जिल्ह्यात वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी वर्धा पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाहतूक शाखेतील अंमलदारांना आता अत्याधुनिक बॉडी-वॉर्न कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आले असून, वाहतूक कारवाई अधिक पारदर्शक आणि पुराव्याधारित होणार आहे.
जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी वाहतूक शाखेला विशेष निर्देश दिले आहेत. अति वेगाने वाहन चालविणारे, दारू पिऊन वाहन चालविणारे तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
यासाठी वाहतूक अंमलदारांच्या गणवेशावर हे बॉडी-वॉर्न कॅमेरे लावण्यात येणार असून, कारवाईदरम्यान फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधातील कारवाईला ठोस पुरावे उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, चलन कारवाईनंतर वादविवाद किंवा गैरवर्तनाच्या घटनाही या कॅमेऱ्यांत कैद होणार असल्याने वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेलाही मोठे बळ मिळणार आहे.
वाहतूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या शासकीय कॅमेऱ्यांमधील फोटो, ऑडिओ किंवा व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारची एडिटिंग अथवा डिलीट करण्याची सुविधा नसल्याने संपूर्ण प्रक्रिया अधिक विश्वासार्ह राहणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अंमलदारांनी केलेल्या कारवाईचे परीक्षण करता येणार असल्याने कारवाईत पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे, सुरक्षित प्रवास करण्याचे तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.


























































