Home ◼️ संपादकीय गरजूंना मदत हीच खरी ग्रामजयंती ; गुरुकृपा ग्रुपचा पाठक परिवाराला आधार

गरजूंना मदत हीच खरी ग्रामजयंती ; गुरुकृपा ग्रुपचा पाठक परिवाराला आधार

सेवाग्राम : परिसरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामजयंती दिन साजरा करताना मानवतेचा सुंदर संदेश देण्यात आला. “गरजूंना मदत करणे हीच खरी ग्रामजयंती” हा विचार प्रत्यक्षात उतरवत गुरुकृपा ग्रुप व स्थानिक नागरिकांनी पाठक परिवाराला मदतीचा हात दिला.

वरुड-सेवाग्राम येथील पोलीस कॉलनी परिसरातील शिव मंदिरातील पुजारी पाठक परिवारावर अलीकडेच दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य श्रीमती वच्छलबाई पाठक यांचे निधन झाले, तसेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेल्या दोन गावरान गायींचाही अचानक मृत्यू झाला. या दुहेरी संकटामुळे परिवार आर्थिक अडचणीत सापडला होता. ही बाब लक्षात घेऊन गुरुकृपा ग्रुप व परिसरातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांनी पुढाकार घेत पाठक परिवाराला आर्थिक मदत केली. विविध संस्थांच्या सहकार्याने सुमारे १२ हजार रुपयांचा धनादेश परिवाराला सुपूर्द करण्यात आला.

या उपक्रमाचे नियोजन आधारवड ज्येष्ठ नागरिक संघ, गुरुकृपा पोलीस कॉलनी, धन्वंतरी रहिवासी संघ, तसेच ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा विचार प्रतिष्ठान (नागपूर) आणि राष्ट्रसंत युवक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी प्रफुल्ल गर्ग, गणपतराव प्रधान, रामदास नवघरे, सुभाष देशमुख, नासरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. परिसरातील अनेक नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग घेत मदतीचा हात पुढे केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेल्या ग्रामविकासाच्या संदेशानुसार, “गावातील गरजूंना मदत करणे हीच खरी ग्रामजयंती” असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे सेवाग्राम परिसरात सामाजिक एकजूट आणि मानवतेचा आदर्श संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!