

जागतिक पातळीवर तणाव निर्माण झालेल्या अमेरिका-इराण संघर्षात तात्पुरता दिलासा मिळाला असून दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांची शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात कठोर इशारा दिल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. “इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते,” असा इशारा ट्रम्प यांनी दिल्याने जागतिक स्तरावर खळबळ उडाली होती. मात्र, पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये तात्पुरती शस्त्रसंधी झाल्याने तणाव काहीसा निवळला आहे. ही शस्त्रसंधी केवळ दोन आठवड्यांसाठी लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, इराणने ही शस्त्रसंधी मान्य करताना अमेरिकेसमोर काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. त्यामुळे इराणने माघार घेतली नसून ठाम भूमिका कायम ठेवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनीही शस्त्रसंधीबाबत अधिकृत दुजोरा दिला आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निवेदनानुसार, जर अमेरिकेकडून पुन्हा कोणताही हल्ला झाला तर त्याला ठोस प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
शस्त्रसंधीच्या अटींमध्ये होर्मुज सामुद्रधुनीवरील नियंत्रण इराणकडेच राहणे, युरेनियम संवर्धन कार्यक्रम सुरू ठेवण्याची परवानगी, अमेरिकेने लादलेले निर्बंध हटवणे, तसेच पश्चिम आशियातील अमेरिकन सैन्याची माघार यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. याशिवाय, प्रादेशिक संघर्षांवर युद्धविराम आणि इराणला नुकसानभरपाई देण्याचाही मुद्दा मांडण्यात आला आहे. सध्या जरी दोन आठवड्यांची युद्धबंदी लागू असली तरी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुढील चर्चा इस्लामाबादमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत दोन्ही देशांदरम्यान सविस्तर चर्चा होऊन भविष्यातील भूमिका ठरवली जाणार आहे. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती काहीशी स्थिरावली असली तरी पुढील वाटचाल कशी राहणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.


























































