Home ◼️ संपादकीय सुनैना डोंगरे महाराष्ट्र पोलिसांची सुवर्णकन्या! हरियाणातील बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सुवर्णपदक ; वर्धा जिल्ह्याचा...

सुनैना डोंगरे महाराष्ट्र पोलिसांची सुवर्णकन्या! हरियाणातील बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सुवर्णपदक ; वर्धा जिल्ह्याचा अभिमान उंचावला

वर्धा : जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार सुनैना डोंगरे हिने नुकत्याच हरियाणातील मधुबन येथे पार पडलेल्या ७४ व्या अखिल भारतीय पोलीस क्लस्टर बॉडीबिल्डिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे महाराष्ट्र पोलीस दल, नागपूर परिक्षेत्र आणि वर्धा जिल्ह्याचा मान अधिक उंचावला आहे.

दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई येथे पोलीस महासंचालक कार्यालयात महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकप्राप्त कामगिरी करणाऱ्या अधिकारी, अंमलदार, खेळाडू आणि प्रशिक्षकांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुनैना डोंगरे हिचा देखील मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र श्री. संदीप पाटील, वर्धा जिल्हा पोलीस प्रमुख श्री. अनुराग जैन (पोलीस अधीक्षक, वर्धा), श्री. सदाशिव वाघमारे (अपर पोलीस अधीक्षक), श्री. विनोद चौधरी (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा) तसेच प्रशिक्षक श्री. राजू उमरे यांनी सुनैना डोंगरे हिच्या क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करून तिचा सत्कार केला.

सुनैना डोंगरे हिने याआधी अमेरिकेत झालेल्या जागतिक पोलीस स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवून भारत आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले होते. तिच्या कामगिरीत तिची निष्ठा, शिस्त आणि समर्पणभाव स्पष्टपणे दिसून येतो. वर्धा जिल्हा पोलीस खात्याला तिचा अभिमान वाटत असल्याचे पोलिस दलाच्या वतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!