
वर्धा : वर्ध्यातील प्रसिद्ध गोसंवर्धन गोरस भंडारावर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक कारवाई करत विविध दुग्धजन्य पदार्थांचे नमुने जप्त केले आहेत. नियमित तपासणी मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान तूप, खवा, गोरसपाक तसेच इतर उत्पादनांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तसेच सुमारे २७० लिटर ताक नष्ट करण्यात आल्याने या कारवाईची जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, FDA च्या अधिकाऱ्यांनी उत्पादन केंद्राची तपासणी केली असता काही तांत्रिक व प्रशासकीय त्रुटी निदर्शनास आल्या. काही उत्पादनांच्या लेबलिंग, आवश्यक नोंदी आणि अन्नसुरक्षा नियमांच्या पालनाबाबत अधिक तपासणीची गरज असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर विविध उत्पादनांचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत पाठविण्याची कारवाई करण्यात आली.
तपासणीदरम्यान उत्पादन केंद्रात साठवून ठेवण्यात आलेल्या सुमारे २७० लिटर ताकाबाबतही अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदविल्याने ते नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे दुग्धजन्य पदार्थ व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून अंतिम प्रयोगशाळा अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या जप्त करण्यात आलेले सर्व नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नमुने निकृष्ट अथवा नियमबाह्य आढळल्यास अन्न सुरक्षा कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
























































