Home ◼️ संपादकीय बदलीसाठी २० हजारांची मागणी ; वर्धेच्या वरिष्ठ लिपीकावर एसीबीची कारवाई

बदलीसाठी २० हजारांची मागणी ; वर्धेच्या वरिष्ठ लिपीकावर एसीबीची कारवाई

वर्धा: बदली करून देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (रापनि) वरिष्ठ लिपिकाला वर्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) साल्यात घेतले. सोमवारी (ता. २५) विभाग नियंत्रक कार्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रापनि विभागात खळबळ उडाली आहे. सचिन ज्ञानेश्वर चांदेकर (वय ४८, रा. चिकणी जामणी, ता. देवळी) असे आरोपी वरिष्ठ लिफ्किाचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे वर्धा आगारात कार्यरत असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याने ते डिसेंबर २०२५ पासून वैद्यकीय रजेवर होते. यामुळे तक्रारदाराने सेवाग्राम मार्गावरील विभाग नियंत्रक कार्यालयात बदलीसाठी अर्ज केला होता. यावेळी वरिष्ठ लिपिक सचिन चांदेकर यांची भेट झाली. कार्यशाळा अथवा विभागीय कार्यालयात बदली करून देण्यासाठी आरोपीने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली.

या प्रकरणाची वर्धा एसीबीने १२ मे, १४ मे आणि २५ मे रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली. त्यात आरोपीने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.मात्र, कारवाईच्या दिवशी आरोपी लाच स्वीकारण्यास टाळाटाळ करीत होता. त्यानंतर एसीबीच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून एक मोबाईल जप्त केला.

तसेच त्याच्या निवासस्थानी तपास प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध सेवाग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वर्धा एसीबीचे पोलिस उपअधीक्षक राकेश साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप मुपडे, पोलिस निरीक्षक कान्होपात्रा बन्सा, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मंगेश गंधे, पोलिस हवालदार पंकज डाहाके, मंगेश झामरे, सचिन गाढवे तसेच राखी फुलमाळी, प्रितम इंगळे, प्रशांत मानमोडे, मनीष मसराम आणि विष्णू काळुसे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!