
वर्धा : महापुरुष महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेली सामाजिक परिवर्तनाची चळवळ मान्यवर कांशीराम यांनी राष्ट्रीय पातळीवर नेऊन बळकट केली. ही परिवर्तनाची चळवळ यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने सहकार्य करून संघटन मजबूत करावे, असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे केंद्रीय कॉर्डिनेटर व महाराष्ट्र प्रभारी राज्यसभा खासदार रामजी गौतम यांनी केले.
वर्ध्यात बहुजन समाज पार्टीतर्फे मान्यवर कांशीराम यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त आयोजित विदर्भस्तरीय कार्यकर्ता संमेलनात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव व विदर्भ प्रभारी डॉ. मोहन राईकवार, महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी मुकुंददादा सोनवणे तसेच महिला नेत्या डॉ. विद्याताई राईकवार, महाराष्ट्र प्रदेशचे कोषाध्यक्ष अब्दुल रौफ भाई, प्रदेश महासचिव नागोराव जयकर, पृथ्वी शेंडे, प्रदेश सचिव दादाराव उईके, विवेक हाडके, प्रफुल मानके, दीपक पाटील, महेंद्र मकेश्वर, मुस्लिम भाईचारा कमेटीचे झोन प्रमुख मोहसीन शेख, तसेच ओबीसी नेते स्करमिश खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश बसपा अध्यक्ष सुनील डोंगरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बहुजन समाजाला शासनकर्ती जमात बनविण्याची संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती. त्या विचाराला प्रत्यक्ष राजकीय बळ देण्याचे काम मान्यवर कांशीराम यांनी केले. आज काँग्रेस, भाजप किंवा इतर पक्षही कांशीराम जयंती साजरी करीत आहेत, हे आपल्या चळवळीचे यश असले तरी कार्यकर्त्यांनी या राजकीय प्रवाहांपासून सावध राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी मुकुंददादा सोनवणे तसेच महिला नेत्या डॉ. विद्याताई राईकवार यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या संमेलनाला विदर्भातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेले सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात कलाकार विकास राजा यांनी सादर केलेल्या प्रबोधनपर सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव व विदर्भ प्रभारी डॉ. मोहन राईकवार यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा सचिव सुरेश दुधे यांनी तर समारोप जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सचिव किशोर मेंढे, बामसेफ संयोजक जानराव ठोंबरे, जिल्हा संयोजिका मंदाताई नाखले, प्रज्ञा दुपट्टे, जिल्हा प्रभारी वैशाली कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भगत, जिल्हा महासचिव मनोज माहोरे, सुधाकर जुनघरे, निखिल भगत, शरद वानखडे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



























































