

वर्धा : शेळी चारण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादात युवकाला कुऱ्हाडीने पाठीवर व गालावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १२ रोजी वानरविहिरा गावात घडली. या प्रकरणी सेलू ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास १३ रोजी बुट्टीबोरी येथील औद्योगिक वसाहत क्षेत्रातून अटक करीत बेड्या ठोकल्या.
विलास धनराज देशमुख असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. प्रकृती नाजूक असून, त्याच्यावर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव सतीश शेंद्रे असे आहे. विलास देशमुख आणि सतीश शेंद्रे हे दोघेही वानरविहिरा शिवारात शेळ्या चारून येत असताना त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, सतीशने विलासच्या गालावर व पाठीवर कुऱ्हाडीने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
सेलू पोलिसात धनराज देशमुख यांनी तक्रार दाखल करताच, गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून, भर पावसात दुचाकीवर फिरून बुट्टीबोरी परिसर गाठून आरोपी सतीश शेंद्रे याला अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगता यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षः गायकवाड यांच्या नेतृत्वात अखिले गव्हाणे, सचिन वाटखेडे, कपील मेश्रा नारायण वरठी, मंगेश वाघडे यांनी केली आहे. याप्रकरणी सखोल तपास सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्ष सुरेंद्र कोहळे करीत असून याप्रकरणी आणखी काय हाती लागते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.