सामाजिक चळवळ, आजचा तरुण आणि करियर…!!”

प्रसेनजित डोंगरे
तालुका प्रतिनिधी गोंडपिपरी,
8275290099,
आज सकाळी बसस्टॉपवर बस ची वाट बघत बराच वेळ उभा होतो. नंतर माहिती झालं की बस यायला खूप उशीर आहे. त्यामुळे मी खुर्चीवर जाऊन बसलो. अगदी माझ्या बाजूलाच जवळपास 35-40 वर्षांचा एक व्यक्ती बसला होता. त्या व्यक्तीकडे बघून सवयीप्रमाणे मी स्माईल केली पण समोरून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मला वाटलं त्यांच माझ्याकडे लक्ष नसेल म्हणून त्यांना मी आवाज दिला आणि म्हटलं,

मी- अहो काका, नमस्कार ! कुठे जात आहात ?

काका- नमस्कार! मी माझ्या मूळ गावी जात आहे. बरं मी काय म्हणतोय तुला कुठं तरी बघितल्यासारखं वाटत आहे. तुझं नाव काय आहे?

मी- मी सुरज दहागावकर.

काका- अरे! हा तुझे लेख/कविता मी फेसबुकवर वाचत असतो. लिखाण जबरदस्त आहे राव तुझं आणि सध्या सामाजिक कार्यात छान अग्रेसर आहेस तू तर…

मी- धन्यवाद काका…

काका- इथे काय करतोस आणि काय प्लॅनिंग केली आहे भविष्याबद्दल…

मी- काही नाही काका. सध्या तर सर्व ठीकच चाललंय. बाकी भविष्यासाठी आहेत प्रयत्न सुरु.

काका- अच्छा छान..खूप पुढे जा, सुरज (बोलतांना सूर थोडा नाराजीचा वाटला)
मी- हो. पण काका तुम्ही नाराज का दिसत आहात आणि सध्या तुम्ही काय करता इथे.
काका- चल सुरज आता बस यायला पण उशीर आहेच तर सांगून देतो माझ्याबद्दल…
बघ मी तुझ्यासारखा एका खेडेगावातून शहरात आलोय. तुझ्या वयाचा असतांना तुझ्यापेक्षाही जास्त उत्साहाने चळवळीत काम करायचो. चळवळ म्हणजे समाजाचं काही तरी ऋण फेडावे या उद्देशाने मी सर्वस्व चळवळीसाठी अर्पण केले. मग आई-बाबा कडे दुर्लक्ष होते गेले. सोबत अभ्यासात मन लागत नव्हते. तरीही मला कसलीही फिकीर नव्हती कारण लोक मला खूप छान म्हणायची, जिथे गेलो तिथे मान-सन्मान भेटायचा. माझी छोटी-मोठी कामे फक्त ओळखीच्या भरवश्यावर व्हायची. त्यामुळे मी वर्तमानात एवढा खुश असायचो की, भविष्य अंधारात जात असतांना सुद्धा मला तिळमात्र जाणीव होत नव्हती…आपल्याच मर्जीत जगत होतो.
पुढे मग वय वाढत होते. त्यामुळे घरच्यांनी लग्नासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. पण प्रत्येक मुलीने मला नकार दिला. कारण माझ्याकडे उत्पनाच काहीच साधन नव्हतं. शेती करावं म्हटलं तर बापाकडे शेतीही नव्हती. मग तेव्हा एका हॉटेल मध्ये १०००/- महिन्याने कामाला लागलो. वयासोबतच गरजा सुद्धा वाढत होत्या. त्यामुळे १०००/- मध्ये रूम किराया,जेवण, कपडे, आवश्यक सामान घेणे या गोष्टी पूर्ण होत नव्हत्या म्हणून वेळेप्रसंगी म्हाताऱ्या होत चाललेल्या आई-बाबाकडे मी पैसा मागायचो.
तेव्हा स्वतःची लाज वाटायची कारण ज्या वयात मी आई-बाबाचा आधार व्हायला पाहिजे होतो त्या वयात मी आई-वडिलांकडूनच माझ्या गरजा पूर्ण करत होतो. आताही आई-बाबाच्या कष्टावर जगतोय. कसं तरी लग्न झालं पण मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही आहे. कारण संसाराचा गाडा ओढताना अनेक समस्या निर्माण होतात. सोबतच आरोग्याचा प्रश्न, आता जगणं कठीण झालं आहे. आजही स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा होऊ शकलो नाही. पण या सर्वांपेक्षा एक गोष्टीचे दुःख हे की, ज्या वयात मी चळवळीत होतो त्याच वयात जर मी माझ्या करियरकडे लक्ष दिले असते तर आज चित्र वेगळे असते…
बघ हे सर्व सांगून तुला निराश करण्याचा माझा अजिबात उद्देश नाही पण जे माझ्यासोबत घडलं ते उद्या तुझ्यासारख्या पोरासोबत घडू नये म्हणून सांगितलं. वाईट वाटलं असेल तर एक मोठा भाऊ समजून माफ कर. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रा…तेवढ्यात माझी बस आली. काकांचा निरोप घेतला, बस मध्ये बसलो पण डोळ्यासमोर तेच चित्र दिसत होते. काकांच्या रुपात माझ्या सारखे अनेक पोर मला दिसू लागली…..
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
म्हाताऱ्या माणसाला धाव म्हणता येत नाही
आणि तरुण पोरांना थांब म्हणता येत नाही
वेळ आहे तोपर्यत करून घ्या स्वतःला सिद्ध
कारण गेलेल्या क्षणाला ये म्हणता येत नाही
मित्रांनो सामाजिक चळवळीत नक्की काम करा पण स्वतःच्या पोटाकडे आधी लक्ष द्या. नाही तर तुम्हाला उद्या कुत्रही विचारणार नाही. मग म्हणू नका की, करियरकडे लक्ष दिले असते तर हि वेळ माझ्यावर आली नसती. आज समाजात डोकावून बघितल्यावर समजेल की, जी माणसं चळवळीत काम करीत आहेत. ती स्वतःच्या पायावर उभी आहेत म्हणून समाजात काम करतात आणि आम्ही तरुण त्याच लोकांसाठी झटतो, काम करतो आणि त्यांचे नाव, त्यांच्या चळवळीचे नाव मोठं करीत जातो..….
स्वतःच काहीही अस्तित्व नसतांना सुद्धा
आम्ही समाज परिवर्तनाचा घेतलाय वसा
माय-बाप आजही राबतात आमच्यासाठी
अन् आम्ही त्यांचा रिकामा करतोय खिसा…
तरुण वयात सामाजिक चळवळीमध्ये काम करीत असतांना ओळखी वाढते, प्रसिद्धी मिळते आणि चार लोक ओळखायला लागली की, आम्हा तरुण पोरांना लयी ख़ुशी होते. त्यामुळे आम्ही करियरकडे लक्ष न देता चळवळीत वळवळ करीत असतो. पण जेव्हा पोटात भुकेची कळकळ सुरु होते. तेव्हा मात्र आपली तळमळ ऐकायला कुणीच नसतो. हि वास्तविकता आहे मित्रांनो. अश्याही परीस्थितीमध्ये पाठीशी खंबीरपणे उभे राहतात ते म्हणजे माय-बाप. त्यामुळे आधी स्वतः यशस्वी कसे होता येईल याचे नियोजन करा नंतर चळवळीत नक्की सहभागी व्हा. कारण तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहचविण्यासाठी तुमचा बाप आजची फाटक्या बनाईनला शिवून लावतो आणि माय घरातील आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून फोडणीच्या तेलापासून ते संपत आलेल्या साबणाच्या चिपडीला नवीन साबण लावेपर्यत काटकसर करते.
हे सर्व लिहण्यामागाचा उद्देश इतकाच की सामाजिक चळवळीत काम करणारी पोर हि साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील असतात. आपण कधी बघितलं आहे का? एखाद्या शिक्षक, डॉक्टर, वकील, व्यावसायिक किंवा एखाद्या अधिकाऱ्यांच्या मुलाला विद्यार्थी दशेत चळवळीमध्ये काम करत असतांना… एक दोन चुकून सापडतीलही पण ९९.९९% चळवळीत काम करणारी पोर हि गरीब कुटुंबातील आहेत….
खरंतर सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकांनी चळवळीत सहभागी होणे गरजेचे आहे पण त्याही पेक्षा आधी आयुष्यात यशस्वी होणे आवश्यक आहे. कारण तुम्ही यशस्वी झालात तरच समाजाला दिशा देऊ शकता नाही तर चळवळ दिशाहीन व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून मित्रांनो आधी स्वतःमध्ये बदल घडवा, समाज आपोआप बदलेल…..

✍🏻-सुरज पी. दहागावकर.
चंद्रपूर.
मो.न.8698615848

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here