शेतकऱ्यांनो थांबा, घाई करु नका; पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी नकोच! कृषी पर्यवेक्षक प्रशांत भोयर

वर्धा : अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस पडतो व त्याच पावसावर शेतकरी पिकांची पेरणी करतात. पण अनेक वेळा पाऊस निघून जातो व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सध्या काही भागात पाऊस पडत आहे. पाऊस आला तरी शेतकर्यांनी पेरणीची घाई न करता ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय खरीप हंगामाची पेरणी करू नये, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक प्रशांत भोयर यांनी केले आहे.

हवामान खात्याने जरी पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी तो मॉन्सूनपूर्व आहे. यामुळे पेरणीची घाई धोकादायक ठरू शकते. शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई न करता सोयाबीन, तूर, पिकांच्या नियोजनाकरिता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड, पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वखराच्या पाळ्या देऊन तयारी करावी. शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.

अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व पावसाचा खंड जरी पडला तरी पीक धरू शकते व शेतकऱ्यांना होणारे नुकसान टाळता येते. त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

यावर्षी सोयाबीन बियाण्याची टंचाई भासू शकते त्यामुळे बियाणे वाया जाणार नाही याकरिता काळजी घेणे महत्वाचे आहे म्हणून पेरणी 5-6 इंच जमीन ओली झाल्याशिवाय करू नये. अन्यथा पावसाचा खंड पडल्यास किंवा पाऊस कमी झाल्यास बियाणे वाया जाऊ शकते. तसेच पेरणीपूर्ण बियाण्याची उगवण शक्ती तपासणी करून पाहावी… पेरणीच्या वेळी जिवाणूसंवर्धक (रायझोबियम, पी एस बी, ट्रायकोडरमा) बुरशीनाशक, कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करावी ज्यामुळे झाडाची निकोप वाढ होऊन उत्पन्नामध्ये वाढ होईल तसेच खत व फवारणीचा खर्च कमी होऊन उत्पादन खर्च कमी होईल

खरीप हंगामातील सोयाबीन हे मुख्य पीक आहे. त्यामध्ये पट्टापेर पद्धतीचा अवलंब केल्यास सरासnरी उत्पादनात 25% वाढ होते. तसेच बी. बी. एफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्यास बियाणे बचत नक्कीच होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणीची घाई करुच नये असे आवाहन कृषी पर्यवेक्षक प्रशांत भोयर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here