
वर्धा : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या रस्ते अपघातांनी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. समृद्धी महामार्गासह राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचे मोठे जाळे असलेल्या वर्धा जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत १३६ अपघातांचे गुन्हे दाखल झाले असून तब्बल ७० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ४० मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे महामार्ग सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वर्धा जिल्ह्यातून समृद्धी महामार्गासह एक राष्ट्रीय महामार्ग, सहा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आणि सात राज्य महामार्ग जात असून एकूण सुमारे ५६० किलोमीटरचे महामार्ग जाळे जिल्ह्यात विस्तारलेले आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि भरधाव धावणारी वाहने यामुळे अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, अति वेगाने वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे आणि चुकीच्या दिशेने वाहन चालविणे ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. विशेषतः दुचाकी चालकांकडून वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष अनेकदा जीवघेणे ठरत आहे. अनेक अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर न केल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचेही समोर आले आहे.
जिल्ह्यातील सावंगी मेघे, हिंगणघाट, सेलू, पुलगाव, देवळी आणि आळीपूर परिसरात अपघातांचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. या भागांमध्ये महामार्गांवर वेगमर्यादेचे उल्लंघन, अवजड वाहनांची वाढती वर्दळ आणि धोकादायक ओव्हरटेकमुळे अपघात वारंवार घडत असल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी रस्ते सुरक्षेच्या मूलभूत सुविधांचा अभावही अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, अपघातानंतर काही दिवस वाहतूक तपासणी मोहीम राबविली जाते; मात्र नंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. महामार्गांवर नियमित स्पीड मॉनिटरिंग, सीसीटीव्ही यंत्रणा, हेल्मेट तपासणी आणि दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, वाढते अपघात रोखण्यासाठी केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी नाही. चालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे, धोकादायक ठिकाणी चेतावणी फलक आणि स्पीड कंट्रोल यंत्रणा बसविणे, तसेच रात्रीच्या वेळी प्रभावी गस्त वाढविणे आवश्यक आहे.
दरम्यान, जिल्ह्यात वाढत्या अपघातांमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळत असून “वेगाचा हव्यास आणखी किती जीव घेणार?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने अपघात रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास आगामी काळात मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



























































