
भिडी : अधिक मासानिमित्त कोटेश्वर येथे दर्शन व स्नानासाठी आलेल्या भाविकांवर रविवारी सकाळी दुर्दैवी प्रसंग ओढावला. वर्धा नदीत आंघोळ करताना दहा वर्षीय बालिकेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर तिच्या वडिलांना स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील प्रियदर्शिनी कॉलेज परिसरात राहणारे मनोज तावडे हे आपल्या कुटुंबासह अधिक मासानिमित्त कोटेश्वर येथे पूजा-अर्चना व स्नानासाठी आले होते. रविवारी सकाळी सुमारे सहा वाजताच्या दरम्यान मनोज तावडे हे त्यांची मुलगी कु. भक्ती तावडे (वय १०, रा. वर्धा) हिच्यासह वर्धा नदीपात्रात आंघोळीसाठी गेले होते.
नदीपात्रातील सिमेंटच्या पायऱ्यांवर शेवाळ व पाणी साचलेले असल्याने मनोज तावडे यांचा अचानक तोल गेला आणि ते मुलीसह खोल पाण्यात पडले. यावेळी त्यांच्या हातातून मुलगी निसटल्याने ती पाण्यात बुडाली. तर मनोज तावडे हेही पाण्यात बुडत असताना त्यांनी मदतीसाठी हातवारे केले.
ही घटना तेथे उपस्थित असलेल्या काही भाविकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने नदीत उड्या घेत मनोज तावडे यांना बाहेर काढले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी आपली मुलगी सोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर उपस्थितांनी तातडीने बालिकेचा शोध सुरू केला. काही वेळाने कु. भक्ती हिला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर बालिकेला भिडी येथील रुग्णालयात आणण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत.


























































